लग्न म्हणजे नव्या जीवनाची आपण पाहत आलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेली सुरवात. मनासारखा जोडीदार मिळाल्यावर त्याच्या साथीने सर्व आशा पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेला प्रयत्न. पण याच स्वप्नाची, नव्या आयुष्याची सुरवात आपल्याचं आईवडीलांनी दिलेल्या शिव्याशापाने आणि नातलगांच्या विरोधाने झाली असेल तर. नव्या जीवनाची सुरवात करताना घरच्यांचा केला जाणारा विरोध, दोन घरातील वाद विवाद आणि एकमेकांचा केला जाणारा अपमान......... नको वाटते हे सारे.............
घरच्यांच्या रोष पत्करून प्रेमाचा हात धरून आपले प्रेम सफल करण्याचा ठाम निर्धार .मनासारखा जोडीदार मिळणे आणि त्याच्याबरोबरीने सर्व आयुष्य घालवण्यासाठी सुरवातीलाच आपल्याचं माणसांबरोबर असा करावा लागणारा संघर्ष .... लहानपणापासूनची नाती तोडून परंपरा रिती मोडून नव्या पर्वाची सुरवात करताना मनात कल्लोळ उठतो. लहानाचे मोठे आपण ज्या घरात झालो जिथून आयुष्याची सुरवात केली आणि तिथूनच बाहेर पडताना त्यांचा असा राग धरून बाहेर पडावे? आपल्याला समजून घेतले नाही की आपले मन जाणून घेतले नाही हा राग प्रेमाचे, मायेचे छप्पर एकएकी नाहीसे झाल्याची जाणीव. आपला निर्णय पटवून देताना आपल्या मनातील भावना सांगताना आपण कुठेतरी कमी पडल्याची उणीव. जीवनसाथी निवडताना मनच नाही तर पूर्णं विचार करून जाणतेपणी घेतलेला निर्णय आपल्याच माणसांना का पटत नाही हा संताप.... आणि त्यांच्या विरोधाला न जुमानता केवळ अंगावरील वस्त्रांनिशी घराबाहेर पडण्याचा निर्णय. आज नवे आयुष्य सुरवात करून एक वर्षा उलटले. या एक वर्षात सर्व संकटांना धीराने तोंड दिले सर्व त्रास सहन करून हिंमत केली. मनात नवीन उमेद होती, आनंद होता आपले विश्व जोडीदारासोबत उभारल्याचा....
पण या सर्वात कुठेतरी मागे तोडून आलेले बंध अस्वस्थ करून जातात. काळाबरोबर काही आठवणी धूसर होतीलाही, पण मोठ्यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या माझ्या आयुष्याची सुरवात शिव्याशापाने झाली आणि ते देखिल माझ्याच माणसांच्या हे मी कसे विसरू शकेन...... एकमेकांची तोंडेही न बघण्याची शपथ घेणारे हे नातेवाईक कदाचित पुढे या शपथा मोडतीलही एकत्र येतीलही पण त्यांनी आधी बोललेल्या शब्दांचे तिखट घाव आयुष्याच्या कोपऱ्यात नेहमी दुखत राहतील.
शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)